Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एमबीबीएसच्या नव्या कॉलेजांमध्ये तिसऱ्या फेरीतच प्रवेश होणार


गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग होणार सुकर

मुंबई : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या आठ नवीन कॉलेजांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने सोमवारी मंजुरी दिली. सरकारी कॉलेजांमध्ये एमबीबीएसच्या ८०० जागा वाढल्या आहेत. मात्र, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबविण्यात येणाऱ्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीमध्येच या जागांचा समावेश होऊ शकणार आहे, अशी माहिती सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांनी दिली. आता नव्या कॉलेजांच्या मान्यतेमुळे उपलब्ध जागा तिसऱ्या फेरीत समाविष्ट होणार असल्याने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आठ कॉलेजांना परवानगी पत्र देण्याचे निर्देश राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून परवानगी पत्र मिळताच या कॉलेजांना विद्यापीठाची संलग्नता घ्यावी लागणार आहे. त्यातच दुसन्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच कॉलेजांचे पसंतीक्रमांक नोंदविले आहेत. तसेच ही गुणवत्ता यादी १ ऑक्टोबरला मंगळवारी जाहीर झाली. त्यामुळे दुसऱ्या फेरीत या नव्या कॉलेजांचा समावेश करावा लागल्यास प्रवेश प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलकडून तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाणार आहे. तसेच या फेरीसाठी उपलब्ध जागा १५ ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे नव्या कॉलेजांना सर्व परवानग्या प्राप्त करून १५ ऑक्टोबरपूर्वी प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा लागणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीला उशीर

सीईटी सेलकडून एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ३० सप्टेंबरला जाहीर केली जाणार होती. मात्र एका दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्याचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करता यावा यासाठी सीईटी सेलने गुणवत्ता यादी १ ऑक्टोबरला जाहीर करण्याचा निर्णय घेतला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.