"जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव, दि.१७ डिसेंबर - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील १८२१ जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ मधून विशेष दुरुस्ती योजनेअंतर्गत स्वच्छतागृह, शौचालय, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग या कामांसाठी ४ कोटी ५३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश असेल तर विद्यार्थ्यांना कोणतेही नेत्र विकार होणार नाहीत,वर्गात पुरेशी हवा खेळती रहावी म्हणून जिल्ह्यातील सर्व १८२१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ६६९१ वर्ग खोल्यांमध्ये प्रत्येक वर्ग खोलीत दोन एलईडी ट्यूब व एक पंखा बसवण्यासाठी १ कोटी ८५ लक्ष रुपयाची तरतूद तसेच वर्ग खोल्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह, शौचालय यांची दुरुस्ती, रॅम्पची दुरुस्ती, वर्ग खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग या कामासाठी २ कोटी ७९ लाख असा एकूण ४ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
